। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
स्टिंग ऑपरेशन प्रकरणानंतर चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या निवडसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्विकारला आहे. चेतन शर्मांच्या राजीनाम्यामुळे भारतीय निवडसमितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. आता हे अध्यक्षपद निवडसमितीमधील अनुभवी माजी क्रिकेटपटू शिव सुंदर दास यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
या घडामोडीबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चेतन शर्मा यांना राजीनामा देण्यासाठी कोणी सक्ती केली नव्हती. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती नेमणार होतो. मात्र चेतन शर्मांनी काल रात्री राजीनामाच दिला.
शिव सुंदर दास हे निवडसमितीचे अंतरिम चेअरमन असतील. जोपर्यंत चेतन शर्मांच्या जागी नवीन निवडसमिती सदस्य निवडला जात नाही, तोपर्यंत कार्यभार सांभाळतील.