। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील महागाव परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. शुक्रवारी (दि. 12) उशिरा रात्रीपासून पहाटेपर्यंत विविध वेळांना मोठमोठ्या आवाजासह जमिनीला कंप जाणवला. महागाव, भोप्याची वाडी, देऊळवाडी, चंदरगाव व कोंडप या गावांमध्ये सलग बसलेल्या या धक्क्यांमुळे ग्रामस्थ घाबरून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजता, मध्यरात्री बारा, पहाटे तीन वाजता, साडेतीन वाजता तसेच सकाळी साडेपाच वाजता हे हादरे बसले. गावकऱ्यांना घरातून बाहेर पडावे लागले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. याआधीही महागाव पंचक्रोशीत असेच हादरे जाणवले होते. त्यावेळी तज्ज्ञांनी हे धक्के भूगर्भातील हालचालीमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थ सातत्याने दहशतीत जगत असून, प्रशासनाकडे योग्य तपासणी व मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
महागाव पंचक्रोशीतील युवा नेते भास्कर पार्टे यांनी सांगितले की, याआधीही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करून हा प्रश्न मांडला होता. त्या वेळेला हे भूगर्भातील धक्के असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा धक्के बसल्याने आम्हाला पुन्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, सुधागड तहसील कार्यालयाकडून तलाठी व सर्कल यांना तातडीने महागाव पंचक्रोशीत पाहणीसाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बापरे! महागाव पंचक्रोशीत पुन्हा जमिनीला हादरे; ग्रामस्थ दहशतीत
