नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील कुंभिवली परिसरात सुरू असलेल्या खाद्य तेलाच्या अवैध तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे ही कारवाई शक्य झाली असून, घटनास्थळावरून तेलाने भरलेले व रिकामे डबे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेतल्याने काही काळ हे प्रकार थांबले होते. मात्र, कुंभिवली गावाच्या हद्दीत निर्जन भागात रात्रीच्या वेळी पुन्हा खाद्य तेलाचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार शेखर मोरे व पथकाने रात्री कारवाई केली. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच तस्करांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनास्थळी 17 तेलाने भरलेले डबे, 48 रिकामे डबे, सुमारे 50 झाकणे (सील) आणि तेल काढण्यासाठी वापरला जाणारा पाईप असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी मोहपाडा येथील रामदुलार यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. न्यायालयीन परवानगी घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हे प्रकरण दाबण्याचे काही प्रयत्न झाले असले तरी खालापूर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.







