अथक मेहनतीच्या जोरावर तीन महिन्याला लाखोंचा नफा
| माणगाव | प्रतिनिधी |
आजच्या तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता शेती व्यवसायाकडे वळून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे. अशीच एक भरारी माणगाव तालुक्यातील न्हावे गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण संजय शांताराम तेटगुरे यांनी घेतली असून त्यांनी आपल्या गावालगतच्या शेत जमिनीत कलिंगडाचा मळा फुलवला. अथक मेहनतीच्या जोरावर ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन महिन्याला दरवर्षी लाखो रुपयांचा नफा मिळवीत आहेत. त्यांचा हा व्यवसाय आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आदर्श देणारा आहे.
न्हावे गावचे सुपुत्र संजय शांताराम तेटगुरे हे गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे शिक्षण एस.वाय.बी.ए.पर्यंत झाले. नंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता आले नाही. यानंतर त्यांनी शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यातून ते कमालीचे यशस्वी झाले. गेली दहा-बारा वर्षांपासून ते आपल्या गावालगतच्या शेतजमिनीत कलिंगड पिकाची लागवड करून तीन महिन्याला लाखोंचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या न्हावे गावच्या लगतची 20 एकर जागा कलिंगड लागवडीसाठी भाड्याने घेतली. कलिंगड लागवड करण्याकरिता त्यांनी सांगली जिल्ह्यातून सिंबा, गोल्डन, सुपरीत, फ्रुटी जातीचे 4 लाख रुपये किंमतीचे सव्वा लाख कलिंगडाची रोपे विकत आणली. भाड्याने घेतलेल्या या शेतीची ट्रॅक्टर व मशागत करण्यासाठी लागणाऱ्या अन्य साधनांचा वापर करून कलिंगड फळाला उपयुक्त ठरेल अशी आळी तयार करून या रोपांची आपले सहकारी मेव्हणे साहिल बिंदुगडे, संजय बिंदुगडे, स्वप्नील बिंदुगडे, शुभम बिंदुगडे यांच्या मदतीने नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस लागवड केली. या रोपांना जवळच असलेल्या नदीतून पाणी पंप लावून दररोज एक तास सर्व रोपांना पाणी देऊन तसेच 13045 व 191919 हि खते वापरून सलग तीन महिने रात्रंदिवस अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी याच्या बळावर हि रोपे चांगल्या प्रकारे फुलविले.
तीन महिन्यात संजय यांच्या कलिंगडाच्या मळ्यात चांगली रसाळ, लालसर व गोड कलिंगड तयार होऊन यांतील गोल्डन जातीचा कलिंगड 10 किलो वजनाचा तयार झाला. सिंबा जातीचा 6 ते 7 किलो वजनाचा कलिंगड तयार झाला आहे. संजय यांचे तयार झालेले हे कलिंगड व्यापाऱ्यांनी ठाणे, मुंबई, गुजरात याठिकाणी विक्रीसाठी नेले आहेत. संजय यांच्या चविष्ठ व गोड कलिंगडामुळे दरवर्षी त्यांच्याकडे ठाणे, मुंबई, गुजरात येथील व्यापारी टनाने कलिंगड घेण्यासाठी येत असतात. यावर्षी 20 एकर जागेत हे कलिंगड पीक घेण्यासाठी संजय याला साधारण 16 लाख रुपये इतका खर्च आला असून हा सर्व खर्च वजा करून महिन्याला 15 लाख रुपयांचा निव्व्ल नफा संजयला मिळाला. याबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना संजय तेटगुरे म्हणाले कि,आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा भाजीपाला, कलिंगड यांसारखी शेती करून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. केवळ तीन महिन्यात आपण अथक परिश्रम घेऊन काहीतरी करण्याचे मनापासून ठरविले तर लाखो रुपयांच्या उत्पन्न तर घेऊ शकतोच. त्यानुसार निश्चितच ध्येय प्राप्ती होऊन आपण आनंदाने जीवन व्यथित करू, असे सांगितले.
