शिक्षण आले फास्टट्रॅकवर

| रायगड | खास प्रतिनिधी|

राज्यात शिक्षक भरतीसाठी राबवण्यात आलेल्या पवित्र प्रणालीद्वारे रायगड जिल्ह्याला 721 नवीन शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेले शिक्षकांच्या रिक्तपदाचे ग्रहण काही अंशी सुटले आहे. 4 ते 6 मार्च या कालावाधीत संबंधित शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळी करुन त्यांना रिक्तपदावर पदस्थापना देण्यात येणार आहे. मात्र, मागणी केलेल्या शिक्षकांपैकी अद्यापही 386 शिक्षकांची जिल्हा परिषदेला गरज आहे.

राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात येते होते. शाळांमध्ये पूर्ण क्षमतेने शिक्षकांची पदे भरलेली नसल्याने एकाच शिक्षकांवर अन्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ताण येत होता. त्यामुळे शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखरे सरकारने 11 हजार शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेऊन पात्र उमेदवारांची निवड यादी 26 फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाकरिता 998, तर उर्दु माध्यमाकरिता 109 अशा एकूण 1107 शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्याला आता अनुक्रमे 673 आणि 48 असे एकूण 721 शिक्षक उपलब्ध झाले आहेत. अद्यापही मागणी केल्यानुसार 386 शिक्षकांची कमतरता आहे. रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात शिक्षणाचे जाळे जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विणले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. जिल्ह्यामध्ये पहिले ते आठवीच्या तब्बल 2 हजार 442 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे. यासाठी 7 हजार 200 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, विविध कारणांनी सुमारे 1 हजार 100 पदे रिक्त झाली. पैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 800 शिक्षकांची भरली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.

Exit mobile version