जिल्ह्यात 443 पदवीधर शिक्षक पदे रिक्त
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न मोठा आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागात पदवीधर शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सरकारने या पदवीधर शिक्षकांच्या जागा पदोन्नती करण्याऐवजी सरळ सेवेतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरळ सेवेची भरती जेव्हा व्हायची तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहावी ते आठवीच्या शाळांवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 443 पदे रिक्त असून, यामध्ये विज्ञान आणि गणित विषयाचे अधिक शिक्षक आहेत. यामुळे शाळांमध्ये विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांवर अधिक भार देण्यात आला आहे.
राज्यात 2010 पासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक वाडी-वस्तीवरील शाळांवर एकेकच शिक्षक आहे. नुकत्याच झालेल्या बदल्या, पदोन्नती व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती यामुळे जिल्ह्यात एक हजार 531 पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची 433, तर उपाध्यापकांची 100 पदे रिक्त आहेत. रायगड जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची एक हजार 373 पदे मंजूर आहेत. यापैकी 930 पदवीधर शिक्षक शाळांवर कार्यरत आहेत.
पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवतात. शाळेत हे पद रिक्त असेल तर थेट त्या वर्गावरच परिणाम होतो. विज्ञान, भाषा, समाज अभ्यास असे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. अनेक शाळांत सहावी ते आठवीपर्यंतच्या विषयांना शिकवण्यासाठी पदवीधर शिक्षक नसल्याने पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेमधून काढून खासगी शाळेत टाकली आहेत. शासनाने लवकर या रिक्त जागा भरल्या नाहीत, तर अनेेक शाळा ओस पडण्याची भीती आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे समाजशास्त्र विषयाचे 52 पदवीधर शिक्षक मंजूर असताना तब्बल 350 पदवीधर शिक्षक अधिक आहेत. पदवीधर शिक्षकांच्या 443 रिक्त जागांमध्ये विज्ञान आणि गणित विषयाचे पदवीधर शिक्षक जागा अधिक रिक्त आहेत. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांवर गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षणाचा अधिक भार दिला आहे.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद