जबाबदारी झटकणार्या अधिकार्यांवर करणार कारवाई
। पनवेल । वार्ताहर ।
कोकणप्रांत शिक्षक मतदार संघाचे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचा रायगड जिल्ह्यातील शिक्षण विभागीय झंझाावती दौरा नुकताच संपन्न झाला आहे. या दौर्याअंती रायगड जिल्हापरिषदेत शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रक्रिया असते. या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असणार्या शिक्षकांना मात्र न्यायहक्काच्या पगारासाठी अधिकार्यांच्या कार्यालयाचे जोडे झिजवावे लागतात. प्रसंगी अधिकार्यांची मनमानी सहन करावी लागते. मात्र कर्तव्यनिष्ठ शिक्षक आ. बाळाराम पाटील हे सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडत असतात. याच भूमिकेतून आ. बाळाराम पाटील यांनी दि.6 ते 12 जानेवारी या कालावधीत रायगड जिल्ह्यातील तालुका निहाय दौर्याचे आयोजन केले होते. यामागील मूळ उद्देश हा मतदार संघातील विविध प्रलंबित कामाला आढावा घेण्यासाठी तसेच शिक्षक संवाद साधत जिल्ह्यातील शैक्षणिक संकुल, शिक्षक तथा शिक्षकेत्तर वृंद याच्या समस्या जाणून घेणे हा होता.
या दौर्याअंती रायगड जिल्हापरिषदेत आयोजित शिक्षण विभागाच्या बैठकीत सभापती, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापतीचे सचिव, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि सर्व शिक्षण विभागातील कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. या चर्चेत आ.बाळाराम पाटील यांनी जबाबदार अधिकार्यांची कानउघाडणी करून शिक्षकांची 68 वैयक्तिक आणि सुमारे 45 शाळांच्या अडचणी अशी सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले. याशिवाय, बर्याच वेळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जेव्हा कार्यालयात जातात तेव्हा सर्वच शिक्षण अधिकारी हजर नसतात. अशावेळी कार्यालयात फेर्या मारून शिक्षक तसेव कर्मचारी मेटकुटीस येतो. तरीही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा किमान आठवड्यातून एकदा तरी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहण्याच्या सूचना आ. बाळाराम पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. तर कामे करताना काही तांत्रिक गोष्टींची अडचणी येत असतील तर आमदार निधीतून वेतन पथक यांना संगणक, प्रिंटर आणि कामासंबंधीत लागणारे सॉफ्टवेअर देण्याचे कबूल करून त्यासंदर्भात ते पुरविण्याचे पत्र जिल्हा नियोजन अधिकार्यांकडे दिले आहे. यानुसार 22 जानेवारीपर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील शिवाय पीएफ संदर्भातील हिशोबाच्या पावत्या अशी प्रलंबित कामे फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण होतील, असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.
- अधिकार्यास कोणतीही कार्यालयीन अडचण असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारची लाच न देता कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या पाठीशी उभा आहे. याशिवाय जर कोणताही अधिकारी आपली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यासाठी असक्षम असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – आ. बाळाराम पाटील, कोकणप्रांत शिक्षक मतदार संघ
