| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांनी 5 डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या 21 हजार 477 आणि माध्यमिक शाळेतील 2 हजार 539 शाळांतील एकूण 96 हजार 800 शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षकांत सर्वाधिक 2 हजार 925 शिक्षक नाशिक जिल्ह्यात, तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 2 हजार 348 गैरहजर होते, असे अहवालात म्हटले आहे.
शालेय शिक्षण विभागाने काढलेला 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली जाऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किती शिक्षक सहभागी झाले आणि किती शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, यासंदर्भातील अहवाल तयार केला आहे. यात माध्यमिकच्या 26 हजार 490 शाळांपैकी केवळ 2 हजार 539 शाळा बंद राहिल्या, तर या शाळांतील 2 लाख 24 हजार 366 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ 13 हजार 216 शिक्षकांनी शाळा बंदमध्ये सहभाग घेतल्याने राज्यातील माध्यमिकच्या शाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होत्या, असे चित्र विभागाच्या अहवालातून दिसून आले आहे. राज्यातील बृहन्मुंबई पश्चिम, ठाणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी, धाराशिव, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत एकूण सर्वच माध्यमिक शाळा सुरू होत्या. या जिल्ह्यांत शाळा बंदचा कोणताही प्रभाव दिसला नाही.






