शिक्षण हा आयुष्य प्रकाशमान करणारा दागिना

रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कल्याणकारी संस्थेचा हातभार


| चौल | प्रतिनिधी |

शिक्षण हा आयुष्य प्रकाशमान करणारा दागिना आहे. त्यात सर्वजण उजळून निघण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारायला हवी. केवळ परिस्थितीमुळे कुणाचे शिक्षण थांबू नये यासाठी प्रयत्न करणे, ही आपली जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने ओळखली तर आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन कृषक कल्याणकारी संस्था, चौलचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले.

संस्थेच्या माध्यमातून नुकतेच अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रवींद्र पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषक कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार प्रमोद पाटील, सचिव प्रकाश पाटील, सदस्य विनायक थळकर, वसंत घरत आदींसह चौलमळा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते. दरम्यान, याच वेळी चौल-सागमळा येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. शाळेत जाण्याची तयारी मुले करतात; पण प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या संस्था नेहमीच पाठीशी राहील, असे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी विनायक थळकर, प्रकाश पाटील यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कृषक कल्याणकारी संस्थेच्या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील यांनी संस्थेला धन्यवाद दिले. शेवटी प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version