देवगडमधील बागायतदार कात्रीत
| देवगड | प्रतिनिधी |
वादळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा बागायतदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वादळी पाऊस पडतो म्हणून आंबा वाचवण्यासाठी एकीकडे फवारणी करावी, तर दुसरीकडे पुन्हा पाऊस कोसळून फवारणीवरील खर्च वाया जात असल्याने आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. हाती येणार्या पिकावरही किडरोगाचा प्रादुर्भाव जाणवण्याची शक्यता दाट असल्याने दरातील घसरणीची भीती आहे. निसर्गाच्या विचित्र कात्रीत बागायतदार सापडल्याने बागायतदारांची झोप उडण्याची वेळ आली आहे.
अलीकडे सातत्याने आंबा पिकाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असे वातावरण आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील मोहोरामध्ये नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने उत्पादन घटले. त्यावेळी आशेने आंबा बागायतदारांनी फवारणी केली खरी; मात्र पहिल्या टप्प्यातील उत्पादनच तुलनेत कमी झाल्याने बागायतदारांमधील निराशा वाढली. पुढे थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने हंगाम लांबण्याची प्राथमिक शक्यता होती. भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने पुन्हा एकदा आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा फवारणीने वेग घेतला. पहिल्या टप्प्यातील हंगाम संपला असे वाटत असतानाच अचानक वातावरणातील उकाड्यात कमालीची वाढ झाली. त्यामुळे आंबा फळगळ होण्यास सुरुवात झाली. किनारपट्टीवरील वातावरण बदलते राहिल्याने अचानक विजांच्या लखलखाटासह अवकाळी पाऊस झाला. आठ दिवसांपासून पावसाळी वातावरण कायम आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने काही भागांत आंबा कलमांचीही मोडतोड झाली. काढणीयोग्य आंबा काही प्रमाणात जमीनदोस्त झाला.







