संपाचा सर्वसामान्यांवर परिणाम

| पनवेल | वार्ताहर |

केंद्र सरकारने ‘हीट अँड रन’ कायद्याला मंजुरी दिल्याने ट्रकचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कायद्याविरोधात देशपातळीवर पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने सुरू असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी चक्काजाम केल्याने त्याचा परिणाम आता दैनंदिन जीवनमानावर झालाआहे.

या कायद्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून देशभरात आंदोलने सुरू आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनचालकांनी चक्काजाम केल्याचा परिणाम आता सर्वत्र जाणवू लागला आहे. दळणवळण ठप्प झाल्याने अत्यावश्यक सेवा विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना बसायला सुरुवात झाली आहे. देशातील इंधन पुरवठ्यावर या संपाचा परिणाम जाणवत असून टँकरचालकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सोमवार दुपार पर्यंतच अनेक पंपावरील इंधनसाठा संपलेला आहे. पनवेलमधील 40 पेट्रोल पंपांपैकी बहूतांश ठिकाणी साठा संपल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.

शालेय वाहतुकीवर परिणाम
पनवेल परिसरामध्ये अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत. एज्युकेशन हब म्हणून पनवेलकडे पाहिले जाते. या भागामध्ये विशेषतः खारघर नवीन पनवेल आणि कळंबोलीमध्ये अनेक नामांकित शाळा आहेत. पनवेलमध्ये विद्यार्थी वाहतूक करणार्‍या व्हॅन आणि बसची संख्या 300 पेक्षा जास्त आहे. तर जवळपास 15 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. पण संपामुळे शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांवर त्याचा परिणाम झाला असून पालकांना मोठी कसरत करावी लागली आहे.
दैनंदिन गरजांवर परिणाम
चालक नसल्याने व्यावसायिक तसेच स्वयंपाकाच्या गॅसची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळेच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल व्यावसायिकांचे गॅस सिलिंडर संपले आहेत. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. पनवेल परिसरातील महामार्गालगत असलेल्या सीएनजी पंप सुरू आहेत. परंतु, जे पंप ऑनलाईन नाहीत, अशा पंपामधील सीएनजी संपला असून डिझेल-पेट्रोलसारखी त्यांची अवस्था झालेली आहे.
Exit mobile version