रायगडात राष्ट्रीय रोहयोची प्रभावी अंमलबजावणी

उद्दिष्ठपूर्तीच्या 173.26 टक्के मनुष्यबळ निर्मिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मजुरांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, जिल्ह्यात 2021/22 या आर्थिक वर्षात 3 लाख 65 हजार 620 इतकी मनुष्यबळ दिवस निर्मितीची नोंद झाली आहे. ही मनुष्यबळ निर्मिती जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्ठ पूर्तीच्या 173.26 टक्के असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे गट विकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना अकुशल स्वरूपात नियमित कामे देऊन 100 मनुष्य दिवस रोजगार निर्मितीची हमी देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात मजुरांच्या कुटुंबाला अधिकार्‍यांनी भेट देऊन आवश्यक असलेली कामे यांची नोंद घेतली. तसेच ग्रामसभा मार्फत कामांची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत घरकुल योजना, वैयक्तिक शोषखड्डे, गुरांचे गोठे, सार्वजनिक कंपोस्ट खड्डे, शौचालये, गावातील अंतर्गत रस्ते, सिंचन विहिरी, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, शेततळे यांसह इतर विकासकामे हाती घेण्यात येत असून, काम करणार्‍या मजुरांना 248 रुपये दिवसाची मजुरी देण्यात येते.

2021/22 या वर्षात रायगड जिल्ह्याला 2 लाख 11 हजार 12 मनुष्यबळ दिवसांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात या योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आल्याने, जिल्ह्यात वर्षभरात 3 लाख 65 हजार 620 मनुष्यबळ दिवस निर्मिती झाली असून, एकूण उद्दिष्टांच्या हे प्रमाण 173.26 टक्के इतके आहे.

Exit mobile version