तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे- चंद्रकांत मांडे

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये जरी शेती होत नसली, तरी माथेरानच्या पायथ्याशी शेती व्यवसाय खूप मोठा आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी भरपूर उपयोगी योजना येत असतात. मात्र, यात तरुणांनी शेतीकडे वळण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन आत्मा समितीचे चंद्रकांत मांडे यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील आर्डे येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतीचा रब्बी हंगाम संपून आता खरीप हंगाम सुरु होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढून त्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषी विभागाकडून खरीपपूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी घेण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील आर्डे येथील गोरक्षनाथ मठात हा कार्यक्रम दि.16 रोजी कर्जत तालुका कृषी विभागाकडून घेण्यात आला. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, आत्मा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पाटील, केतन झांजे, माजी सरपंच जयवंत वेहले, परशुराम भला, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके, अर्जुन केवारी, मंडळ कृषी अधिकारी ए.बी. गायकवाड, कृषी विभागाचे पर्यवेक्षक किरण गंगावणे, विनोद जाधव, सचिन केणे, मंगेश गलांडे, विजय गंगावणे कृषी सहाय्यक आकाश गावंडे, आत्मा समितीच्या मीनल देशमुख, रेश्मा मते यांसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कृषी विभागाच्या योजनांमध्ये सातबारा गरजेचा असतो. मात्र शासनाची पीमएफएमइ योजनेत सातबारा नसतानादेखील कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येतो. यात दहा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. तर या योजनेत फळ प्रक्रिया उद्योग, भाजी प्रक्रिया उद्योग, दुग्धजन्य पदार्थ, घाण्यावरच तेल, पापड उद्योग करता येतात. तसेच उद्योगांसाठी प्रशिक्षणाची सो देखील कृषी विभाग करणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक नेरळ मंगेश गलांडे यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी अपघात विमा योजना हि आता गोपीनाथ मुंढे सानुग्रह अनुदान योजना म्हणून संपूर्ण तालुकास्तरावर सुरू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुदान दिले जाते. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे याची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना नाचणीची बियाणे मोफत वाटण्यात आली. तर नाचणी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेऊ नका, आपण या शेतकऱ्यांची यादी करून कृषी पर्यवेक्षक यांना द्यावी जेणेकरून या शेतकऱ्यांना शासनाकडून बियाणे पुरवता येतील, कृषी बाबत उपकरणे घेण्याची असल्यास महा डिबीटीवर आपण अर्ज करावा. जेणेकरून त्याबाबत शासनाकडून आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येईल एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तेव्हा समूह शेती ही खूप फायदेशीर ठरणार असल्याने समूह शेतीकडे शेतकऱ्यांनी वळायला हवं,पीक विमा योजना असून त्याचा शेतकरी चांगला लाभ घेत आहेत तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ मिळणे गरजेचे असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी शेतकऱ्यांना दिली.

Exit mobile version