43 लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत
। पनवेल । वार्ताहर ।
उलवे भागात राहणार्या एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेली नायजेरीयन महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. आलीशा केम (25) असे या नायजेरीयन महिलेचे नाव असून तिच्याकडे तब्बल 43 लाख रुपये किंमतीचे कोकेनच्या कॅप्सुल सापडले असून न्हावा-शेवा पोलिसांनी तिला अटक केली आहे. या महिलेने कोकेन कुठून आणले? तसेच ते कोणाला विक्री करणार होती? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
उलवे, सेक्टर-17 मध्ये राहणार्या शमशाद बेगम या रिक्षामध्ये पर्स विसरुन घरी निघून गेल्या होत्या. काही वेळानंतर शमशाद बेगम यांना त्यांची पर्स रिक्षामध्ये विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाची शोधा-शोध सुरु केला. यादरम्यान नायजेरीयन महिला त्याच रिक्षामधून आली असता बेगम यांनी नायजेरीयन महिलेकडे पर्सबाबत चौकशी केली. मात्र, तिने टाळाटाळ करत शमशाद बेगम यांना धक्का देऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे शमशाद बेगम यांनी आरडा-ओरड करुन आपल्या पर्ससाठी नायजेरीयन महिलेचा पाठलाग सुरु केला.
यावेळी या नायजेरीयन महिलेला पकडण्यासाठी काही नागरिक पुढे आल्यामुळे नायजेरीयन महिला तेथील एका दुकानात घुसल्याने दुकान मालकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तेथे पोलीस आल्याचे लक्षात आल्यानंतर नायजेरीयन महिलेने तिच्याजवळ असलेले अंमली पदार्थ असलेली पर्स दुकानातील शौचालयात टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शमशाद बेमग आणि पोलिसांनी नायजेरीयन महिलेला अडवून तिच्या पर्सची तपासणी केली. यावेळी त्यात 43 लाख रुपये किंमतीचे कोकेनच्या कॅप्सुल आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी नायजेरीयन महिला आलीशा केम हिला ताब्यात घेतले.
अटकेतील नायजेरीयन महिला तिच्याजवळ असलेले अंमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, शमशाद बेगम या महिलेमुळे तिचा प्रयत्न फसला. त्यामुळे नायजेरीयन महिलेने तिच्याजवळ असलेले अंमली पदार्थ टाकून पळण्याचा प्रयत्न केला असता, तिला शमशाद बेगम आणी इतरांच्या मदतीने पकडण्यात यश आले आहे. या नायजेरीयन महिलेकडून 43 लाख रुपये किंमतीचे कोकेनचे कॅप्सुल हस्तगत करण्यात आले आहेत.
– अंजुम बागवान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा पोलीस