13 वर्षीय मुलीवर रिक्षामध्ये लैंगिक अत्याचार, दोघांना अटक
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी सुफियान कुरेशी याला अटक केली आहे. यामध्ये आरोपी सुफियान याच्या रिक्षाचालक मित्रानेदेखील याच पीडित मुलीला जूनमध्ये रिक्षामध्ये जबरदस्तीने पनवेलच्या एका पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक मोहसिन इस्माईल शेख (वय 25) याच्याविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अल्पवयीन पीडिता पनवेल भागात राहण्यास असून आरोपी मोहसिन शेख हा पळस्पे फाटा येथे राहण्यास आहे. आरोपीने गेल्या काही महिन्यांपूर्वी पीडितेसोबत ओळख वाढविली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने 21 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडितेला आजिवली येथून आपल्या रिक्षामधून जबरदस्तीने पनवेल येथील एका पार्किंगमध्ये नेत तिच्यावर रिक्षामध्येच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसर्या दिवशी तिला घरी सोडले. त्यानंतर आरोपी मोहसिन शेख याचा मित्र सुफियान कुरेशी (वय 28) यानेही 21 ऑगस्ट रोजी या पीडित मुलीला फिरण्यासाठी नेत तिच्यावर कोन गाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर अश्लील कृत्य केले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.