। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना 1 जानेवारी 2022 पासून नवीन वेतन करार लागू करण्यात आला आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या 7 बैठका झाल्या असून कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने 28 ऑगस्ट रोजी सकाळपासून बंदर व गोदी कामगार बेमुदत संपावर जात आहेत, असे अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे कामगार नेते अॅड. एस.के. शेट्ये यांनी सांगितले आहे.
अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांची बैठक 26 ऑगस्टला दिल्लीत झाली असून, या बैठकीत 28 ऑगस्टला प्रमुख बंदरांमध्ये संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 ऑगस्टला इंडियन पोर्ट असोसिएशनने फेडरेशनच्या नेत्यांना बोलणीसाठी दिल्लीत पाचारण केले होते. तसेच, 28 ऑगस्टला देखील द्विपक्षीय वेतन समितीची बैठक दिल्लीत होणार आहे. जोपर्यंत सन्माननीय तडजोड होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे बंदर व गोदी कामगारांनी सांगितले आहे.