रोजगारातून सक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न- चित्रलेखा पाटील

शेकापच्या भविष्यवेधी चळवळीला उत्स्फुर्त प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सध्याचे राजकारण पाहता राज्यकर्ते टीका करण्यावर भर देत आहेत. एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. तरुणांना भेडसावणारा महागाई व बेरोजगाराचा प्रश्‍न गंभीर असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष कायमच कष्टाला, रोजगाराला महत्व देत आला आहे. हा विचार घेऊन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. अलिबागच्या इतिहासात हा पहिलाच मेळावा असून तो युवक व युवतींसाठी महत्वाचा आहे. यातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोठ-मोठ्या कंपन्या बेरोजगारांना रोजगार अलिबागमध्ये प्रथमच आल्या आहेत. एक कर्तव्य म्हणून पक्षाच्या माध्यमातून हे काम हाती घेतले असून यातून सक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने युवक युवतींसाठी पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि.10) रोजगार मेळावा भरविण्यात आला. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते द्वारकानाथ नाईक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी नगरसेवक अनिल चोपडा, सुरेश घरत, विलास म्हात्रे, सत्यविजय पाटील, अ‍ॅड. मनोज धुमाळ, आक्षीच्या सरपंच रेश्मा पाटील, वेश्‍वीच्या उपसरपंच आरती पाटील, रविंद्र पाटील, उसरोलीचे सरपंच मनिष नांदगांवकर, सरपंच रोहीणी पाटील, शहर चिटणीस अशोक प्रधान, सोहम वैद्य, नवशाद मुजावर, मधुकर ढेबे, मृदुला मगर, मनोज घरत, विनायक पाटील, अभिजीत वाळंज, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, दिपक पाटील, अनिल पाटील, नरेश गोंधळी, संजय पाटील, मनोज पाटील आदी शेकापचे पदाधिकारी, तसेच पुरोगामी युवक संघटना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे मार्गदर्शन करताना, चित्रलेखा पाटील यांनी सांगितले कि, स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा, महाविद्यालये सुरु केली. शाळांच्या माध्यमातून अनेकांना नोकर्‍या दिल्या. दादा,भाऊंची शिकवण, संस्कार स्मरणात ठेऊन आमदार जयंत पाटील यांनी एक पाऊल पुढे जात अनेक संस्था सुरु केल्या. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिकांना नोकर्‍या देण्याचा प्रयत्न केला.या मेळाव्याचे नियोजन शेकाप कार्यकर्त्यांंसह सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य पध्दतीने केले आहे. अनेक कार्यकर्ते घराघरांत फिरले. संपूर्ण टीमनेदेखील प्रचंड मेहनत घेतली. प्रत्येकाच्या मेहनतीमुळे हा भव्यदिव्य असा मेळावा उभा राहिला आहे. लाल बावट्याच्या छत्रछायेखाली काम करताना जे संस्कार मिळाले. त्यातून सकारात्मक कार्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न या मेळाव्यच्या माध्यमातून केला आहे. आजच्या या मेळाव्यातून युवक युवतींना रोजगाराची संधी मिळणार आहे. या अनुभवातूनच व्यक्तीमत्व विकास महत्वाचा ठरत आहे.

तरुणांना मिळाला हक्काचा रोजगार
या मेळाव्यात ग्रामीण भागातून युवक युवती मोठ्या संख्येने आले आहेत. या लाल मातीतील मुले मेहनती असून त्यांच्या कर्तृत्वातून कंपनीचे नाव वेगळ्या उंचीवर नेतील हा विश्‍वास आहे. या मेळाव्यातून रोजगार निर्माण करून देण्याचे एक कर्तव्य म्हणून जबाबदारी हाती घेतली आहे. यातून सक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रलेखा पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप


Exit mobile version