14 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये सामावेश करण्यासाठी प्रयत्न

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील 14 किल्ले आणि इतर काही ठिकाणांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पुरातत्व खात्याने निविदा मागवल्या असून त्यासंदर्भात मोठा प्रस्ताव युनेस्कोला पाठवण्यात येणार आहे. या वारसा स्थळांमध्ये स्वराज्यातील 14 किल्ल्यांचा सामावेश असून कोकणातील कातळ शिल्पाचाही सामावेश आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री अमित देशमुख हे यासाठी पाठपुरावा करत आहेत. याआधी महाराष्ट्राने प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोला पाठवला होता. तो प्रस्ताव त्यांच्याकडून तत्त्वता स्विकारण्यात आला आहे. त्यानंतर ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी कशी योग्य आहेत व त्यांचे कसे जतन करता येईल याचा मुद्देसूद प्रस्ताव तज्ज्ञांकडून तयार करुन घ्यावा लागतो. त्या प्रस्तावासह अहवाल परत युनेस्कोला पाठवण्यात येतो आणि त्यानंतर तज्ज्ञ लोकांकडून त्या ठिकाणची पाहणी केली जाते. त्यानंतर सदर स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबत युनेस्को विचार करते.
महाराष्ट्राने पाठवलेल्या प्राथमिक प्रस्तावात रायगड, राजगडासहीत गोव्यातील फणसईमाळ येथील कातळशिल्पाचा सामावेश आहे. मराठा लष्करी स्थापत्य आणि गनिमी कावा या दोन गटात या 14 किल्ल्यांचा सामावेश करुन प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता. हजारो वर्षांपूर्वी काढण्यात आलेली कातळशिल्पे ही देशाच्या संस्कृतीचे प्रतीक असून त्याचे जतन व्हायला पाहिजे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

प्रस्तावात असलेले किल्ले
रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा), सुवर्णदुर्ग, खांदेरी

Exit mobile version