म्होरक्यासह आठ डिझेल चोरांना अटक

। पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासह इतर विविध ठिकाणी डिझेलसह वाहनांचे टायर चोरी करणार्‍या टोळीच्या म्होरक्यास त्याचे साथीदार अशा एकूण 8 जणांच्या टोळीस नवी मुंबई गुन्हेशाखेने जेरबंद केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी टोळीचा म्होरक्या सलमान कलदाणी याच्यासह कमल चंद्रपाल राठोड, शेरसिंग नरफतसिंग राठोड, आकाश चव्हाण, रवी सोनकांबळे, अविनाश चव्हाण, फिरोज नासीर कलदाणी, जुनेद शेख व अशोक मस्के उर्फ कांचा अशा सहा जणांना अटक केली आहे. यातील टोळीच्या म्होरक्याविरोधात नवी मुंबईतील पनवेल, उरण, एपीएमसी, कोपरखैरणे, कामोठे, रायगडमधील रसायनी, खोपोली व नागोठणे पोलीस ठाण्यात अशा स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हयातील टोळीचा बंदोबस्त करण्याचे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, यांनी दिलेल्या गोपनीय माहितीवरुन डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील म्होरक्या सलमान नासीर कलदाणी यांस सापळा रचून त्याच्यासह सहकार्‍यांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील आरोपी सलमान नासीर कलदाणी व त्याचे साथीदार कारने जेएनपीटी रोड, खारघर, पनवेल, वाशी, घोडबंदर रोड इत्यादी ठिकाणी फिरुन रस्त्याच्या कडेला पार्किग करुन ठेवलेल्या ट्रेलर किंवा कंटेनरवरील चालक झोपी गेला असल्याचे किंवा वाहनाजवळ कोणीही नसल्याचे पाहून ट्रकच्या डिझेल टाकीमध्ये पाईप टाळून ते सोबत आणलेल्या कॅनमध्ये भरुन डिझेल चोरी करण्याचा गोरखधंदा करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह रूपेश पाटील, सागर रसाळ आदींच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे.

Exit mobile version