। पनवेल । वार्ताहर ।
भांडणाचा राग मनात धरून लाकडी दांडा, दगड-विटा व हाताबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत रामसिंग मोहन चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामसिंग व वरुण ऊर्फ अर्जुन चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी विनोद चव्हाण यांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर वरुण ऊर्फ अर्जुन चव्हाण व त्याचा भाऊ तरुण चव्हाण हातात फावड्याचा दांडा घेऊन व त्याच्यासोबत त्याची मानलेली बहीण लक्ष्मी किसन राठोड हे आले.
यावेळी त्यांनी रामसिंग, त्याचा भाचा व मुलगा पिंट्या यांना मारहाण केली. या मारहाणीत रामसिंग गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वरुण ऊर्फ अर्जुन मधुकर चव्हाण, तरुण मधुकर चव्हाण व लक्ष्मी किसन राठोड यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.