पनवेल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी ।
सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने दिलेल्या 666.23 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडींचा अपहार करून पसार झालेल्या कामगाराला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे 66 लाख 62 हजार 300 रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणाऱ्या शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने या सोन्याचा अप्रामाणिकपणे अपहार केल्याची घटना गुरुवारी (दि.20) घडली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.21) पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी तत्काळ विविध पथके स्थापन करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने आरोपीचा माग काढत त्याचे मूळ गाव असलेल्या खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे धाव घेतली. तेथे शोधमोहीम राबवून शुभम खिलारे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून अपहार केलेल्या 666.23 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अवघ्या 48 तासांत आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-3, पनवेल आणि सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल आणि पोलिस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.







