दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

। श्रीवर्धन । समीर रिसबूड ।

पुणे- आळंदी येथील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि.1) घडली. पाण्याच्या खोलीचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी परिसरातील कॉलेजचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी आणि फिरण्यासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्राचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली. दिवेआगर येथील ‘भाऊ मारूती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या टीमने अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहेत. या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या काळात घडलेल्या या दुःखद घटनेने दिवेआगर व परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.

विद्यार्थ्यांची नावे
तन्मय दत्तात्रय वहीले, सुमित भरत अहिरे, प्रणव रामदास बनसोडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहीले, यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, कौस्तुभ संदीप दौंड अशी या विद्यार्थ्यांची नावे असून सर्वांचे वय 16 वर्षे आहे.
Exit mobile version