। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
दिवेआगर येथे समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. दिवेआगर येथील दुर्घटनेला चोवीस तासही पूर्ण झाले नसताना श्रीवर्धनच्या समुद्रात पर्यटक बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
समुद्रातील संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून किनाऱ्यावर लाल बावटा लावण्यात आला आहे. तसेच समुद्रात काही अंतरावर धोकादायक क्षेत्र दर्शविणारे बोयेही लावण्यात आले आहेत. मात्र, या इशाऱ्यांकडे पर्यटकांकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. किनाऱ्यावरील स्थानिक नागरिक आणि विक्रेते पर्यटकांना समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नका, अशा सूचना देण्यात येत आहेत. समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच लाटांच्या प्रवाहामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तरीही अनेक पर्यटक या सूचनांकडे कानाडोळा करून समुद्रात उतरत आहेत.
दिवेआगर येथील दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असताना श्रीवर्धन येथे मात्र पर्यटकांकडून खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून जीवरक्षकांची नियुक्ती, नियमित गस्त आणि पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांनीही पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची किंमत ओळखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.






