| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता 288 जागांसाठी 8272 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 10,900 अर्ज दाखल झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उत्सुकता अधिकच तीव्र होत आहे. राजकीय पक्ष आपापल्या राजकीय आघाड्या मजबूत करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, सोमवारी (दि.4) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता 8272 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 10900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर 9260 उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता 8272 उमेदवार उरले असून, त्यांच्या भवितव्याचा फैसला 20 नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये होणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.