जिल्ह्यातील आठ शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थांचा सहभाग
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील विजयभूमी विद्यापीठात ‘एक भारत हम भारत’ या उपक्रमाच्या वतीने, मैत्रेय दादाश्री यांच्या प्रेरणेतून, प्रथमच भारत युवा कॉन्क्लेव्हचे भव्य आयोजन करण्यात आले होते. विजयभूमी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये रायगड जिल्ह्यातील आठ शाळा व महाविद्यालयांमधील 120 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
कॉन्क्लेव्हची सुरुवात राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या विषयावरील प्रभावी पॅनल चर्चेने करण्यात आली. त्यानंतर एक भारत हम भारत या उपक्रमाचा प्रेरणादायी प्रवास सादर करण्यात आला. पहलगाम येथून सुरू झालेल्या श्रद्धांजली यात्रेपासून, 18 राज्ये व 61 शहरांपर्यंत पोहोचलेल्या या प्रवासाने राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
‘जे करता ते प्रेमाने करा आणि जे प्रेमाने करता ते राष्ट्रासाठी करा’ या संकल्पनेवर आधारित, विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगीत आणि मृत्तिका कला (क्ले मॉडेलिंग) यांवरील प्रत्यक्ष कार्यशाळा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भारताच्या विकासासाठी 12 देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणारी गीते, AIचे 12 नाविन्यपूर्ण उपयोग आणि 12 मृत्तिकाकलेतील मॉडेल्स सादर करून भारतासमोरील विविध आव्हानांवर सर्जनशील उपाय मांडले.
कार्यक्रमात मानवी साखळी रचून एक भारत, अखंड भारतासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची शपथ घेण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दर महिन्याला किमान एक तास राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केली. दिवसाचा समारोप विद्यार्थ्यांच्या सादरीकरण व गौरव समारंभाने झाला. या प्रसंगी डॉ. संजय पाडोदे (अध्यक्ष, विजयभूमी विद्यापीठ),कल्पना पाडोदे संचालिका,विजयभूमी आणि अनुराधा गोखले एक भारत हम भारत, डॉ कुंती नागवेकर, डॉ हेमंत तडसरकर,योगेश्वर सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
