विद्यार्थ्यांना पाण्यासाठी स्टील बॉटलचे वाटप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील जांबरुंग येथे असलेल्या विजयभूमी विद्यापीठ यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी वृक्षलागवड केली, तर शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी स्टील बॉटलचे वितरण करण्यात आले.
विजयभूमी विद्यापीठात ‘एक पेड गुरु के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्जतजवळील जांबरुंग गावात असलेल्या विजयभूमी विद्यापीठात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या झालेल्या या कार्यक्रमात शिक्षा केंद्राच्या विद्यार्थिनी, जांबरुंग येथील पीएनपी शाळेचे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक रमेश चंदू पिंगळे आणि जिल्हा परिषद केंद्रशाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत भगत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गिर्यारोहक सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी मोहिमेची कल्पना आणि महत्त्व सांगून केली. वृक्षारोपणाद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती आणि निसर्गमातेला कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमात विजयभूमी युनिव्हर्सिटी जांबरुंगच्या संचालिका कल्पना पडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील उज्ज्वला करंभे, ऋषिकेश घाडगे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती दिली आणि त्यांना वृक्षारोपणात मार्गदर्शन केले. तर, विद्यार्थ्यांसाठी गीतगायन, भाषण आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यापीठाने या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वितरित करत प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि टिकावदार जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.