| तळा | वार्ताहर |
नगरपंचायत आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली तळा कनिष्ठ महाविद्यालय, मुळे हॉटेल कॉर्नर, तांबट आळी, नगरपंचायत, बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी काढण्यात आली.
या रॅलीमध्ये तळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, अॅड. निलेश रातवडकर, तळा नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. बी.एन. दयानेकर, प्रा. एन.सी. पाटील, प्रा. बी.एस. कुळकर्णी, प्रा. एल.आर. गायकवाड, प्रा. डी.टी. आंबेगावे व विद्यार्थी सहभागी झाले होते. यादरम्यान नगरपंचायत तळा येथे मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या रॅलीदरम्यान स्वच्छ भारत-आदर्श भारत, स्वच्छ तळा-सुंदर तळा आदी घोषणा देण्यात आल्या. स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम दि. 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. या अनुषंगाने तळा नगरपंचायत आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.