कांदापोहे ते शिववडापाव वाटपाचा प्रवास कौतुकास्पद
| नागोठणे | वार्ताहर |
शिवसेना नागोठणे शाखा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख व राजिपचे माजी सदस्य किशोरभाई जैन मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विसर्जनासाठी येणार्या गणेशभक्तांसाठी शिव वडापावची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळेच कोरोनाची मधली दोन वर्षे वगळता किशोरभाई जैन मित्रमंडळाने गेली 30 वर्षे शिव वडापाव वाटपाची आपली परंपरा जोपासल्याचे दिसून आले.
शिवसेना नागोठणे शाखेच्यावतीने अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी अनेक वर्षांपूर्वी सुरु केलेली गणेश भक्तांसाठी कांदापोहे वाटपाची प्रथा काही वर्षांपूर्वी शिववडापावचे वाटपापर्यंत पोहोचल्याने या उपक्रमाचे नागोठणे पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
नागोठण्यातील अंबा घाटावर गुरुवारी झालेल्या अनंत चतुर्दशीला किशोरभाई जैन मित्रमंडळाच्या वतीने शिव वडापाव वाटप शिवसेनेच्या नागोठण्यातील पदाधिकार्यांकडून करण्यात आले. यासाठी खास मंडप उभारण्यात आले होते. यावेळी स्वतः किशोर जैन हे स्वतः भाविकांना शिव वडापावचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत नागोठण्याचे माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अखलाक पानसरे, शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश जैन, संजय काकडे, शैलेश रावकर, राजू पिताणी, राजू टेमकर, धनंजय जगताप, अनिल महाडिक, जितेंद्र जाधव, प्रकाश कांबळे, सुरेश कांबळे आदींसह नागोठण्यातील शिवसैनिक या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी झाले होते.