| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी तसेच, महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन 2024 च्या कन्याथॉन मॅरेथॉनच्या दुस-या पर्वाचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपट्टूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मन जिंकून घेतली. तर, स्पर्धेतील मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला.
कर्जतमध्ये दुस-यांदा संपन्न झालेल्या या भव्यदिव्य कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये तीन हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतरासाठी शाळा, माध्यमिक विद्यालय, कॉलेजचे असंख्य विद्यार्थी, इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृध्द आणि दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याच महत्वपूर्ण काम केल आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेले देखण आणि निटनेटके आयोजन तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने असलेली कडक पोलिस प्रशासनाची व्यवस्था यामुळे ही स्पर्धा अत्यंत जल्लोषमय व आनंदी वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी आमदार महेंद्र थोरवे, विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा, कल्पना पडोडा, कर्नल दत्ता, अनिल राव, विकास चित्ते, मीना थोरवे, मनोहर थोरवे, अॅड. संकेत भासे, अभिषेक सुर्वेप्रसाद थोरवे यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.