एकदराच्या खाडीत जेट्टीअभावी वाळुवरच होतोय मासळीचा लिलाव

। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड-एकदरा समुद्र खाडीत समांतर सुरक्षित जेट्टी नसल्याने समुद्रात मासेमारी करून येणार्‍या नौकांना मासळी उतरविण्यास सोय उपलब्ध नाही. त्यामुळे किनार्‍यावर वाळूवर मासळी उतरवून लिलाव करावा लागत आहे. त्यामुळे मच्छिमारांची रोजच कुचंबणा होताना दिसत आहे. परिणामी, जेट्टी उभारण्याची मागणी मच्छिमारांनी केली वारंवार केली. परंतु आजतागायत जेट्टीच्या मागणीबाबतची पूर्तता झाली नाही, अशी माहिती रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली.

एकदरा ही समुद्र खाडी विविध कारणाने गाळाने भरली असून ओहोटीच्या वेळी समुद्रातून मुरूड- एकदरा खाडीत येताना दिशादर्शक बत्तीकडून खाडीत येताना नौका वाळूत तासनतास रुतून बसत असतात. त्यामुळे मार्केटला येणारी मासळी देखील खराब होऊन विकली जात नाही. भविष्यात विचार करून मुरूड किनारा ते दिशादर्शक बत्ती पर्यत तरी समांतर जेट्टी करणे गरजेचे आहे, असे मत मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी व्यक्त केले.

आजच्या घडीला मासेमारी करून येणार्‍या नौका मुरूड मासळी मार्केट पाठीमागील किनार्‍यावर मिळेल तेथे पुळणीवर म्हणजे धक्का मिळेल तेथे लावाव्या लागत असून जेट्टी नसल्याने मच्चीमारांना खूपच त्रास होताना दिसत आहे.केवळ किनार्‍यावर पकट्या बांधून उपयोग नाही अशा प्रतिक्रिया अनेक मच्चीमार मंडळींनी गुरुवारी सकाळी बोलताना व्यक्त केल्या.ही खाडी गाळाने भरू नये यासाठी येथे ग्रोहॅन्स बंधारा व्हावा अशी देखील मागणी मच्चीमारांनी या पूर्वीच शासनाकडे केलेली आहे. बंधार्‍याचा प्रश्‍न देखील प्रलंबित आहे.जेट्टी आणि बंधारा हे दोन्ही प्रश्‍न महत्त्वाचे असून सध्य स्थितीत एकतरी प्रश्‍न जलद सुटणं गरजेचे आहे.

येथे मजबूत जेट्टी असेल तर सर्व स्तरावर उपयोग होउ शकतो. जेट्टी असल्यास नौका कधीही मासळी उतरवू शकतात. शिवाय पदमजलदुर्ग जलदुर्गाकडे जाण्यासाठी पर्यटकांना देखील अत्यन्त सोयीचं होऊ शकते. अपघात घडण्याची शक्यता नसते. मुरूड- एकदरा ही मुख्य समुद्र खाडी असून 3 वर्षां पूर्वी खाडीतील गाळ उपसला होता. तरीही पुन्हा खाडी गाळाने भरली आहे.ग्रोहांस बंधारा असल्यास खाडीची खोली वाढेल. ओहटीच्या वेळेस विनासायास नौका किनार्‍यावर येऊ शकतील.

Exit mobile version