नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुडला जोडणारा महत्त्वाचा असणारा एकदरा पुलाच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिक संभ्रमात असून, चिंताग्रस्त झाले आहेत. एकदरा पूल 62 वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने या पुलावरचे सुरक्षित कठडे व बेअरिंग पूर्णतः खराब झाल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावरून एकदरा, माझेरी, राजपुरी, खोरा, डोंगरी या गावातील सर्व ग्रामस्थ रोजच्या रोज मुरुड शहराकडे रोज ये-जा करीत असतात. पुलाची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांनी नाराजी दर्शवली होती.
याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन या पुलाच्या दुरुस्तीकरिता चार कोटी रुपये मंजूर करुन हे काम ठाणे येथील संरचना या कंपनीला देण्यात आले होते. या कामाला 20 जानेवारी 2023 पासून सुरुवात झाली होती. पुलाच्या खालचे काम प्रगतीपथावर होते. परंतु, पुलाचे कठडे जसेजसे दिसून येत आहेत, हे कठडे धोकादायक असून, एकदा मोटारसायकलस्वाराने साधारण धडक दिली तरी कठडे तुटून या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यात हे काम बरेच दिवस काम बंद असल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत. याच पुलाखाली कोळी मच्छिमार बांधव आपल्या बोटीची दोरखंड टाकून बोटी नांगर टाकून उभ्या करत असतात. कठड्याचे काम व पुलाचे काम पुन्हा लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी सर्वच स्थरावर होत आहे.