मुख्यमंत्रीपदावरुन सपशेल माघार
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याला चार दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप नेहमीप्रमाणे वापरा आणि फेका या नीतीप्रमाणे शिंदेंचा वापर करुन त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेणार असल्याची चर्चा होती. ती आज खरी ठरली. मागील चार दिवसांपासून नाराज असलेल्या शिंदेंनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करीत सपशेल माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेंनी भाजपापुढे हात टेकल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रीपदाची अपेक्षा ठेवलेल्या शिंदेंच्या आमदारांची चांगलीच नाचक्की झाल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवून शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सत्ता मिळवली. मात्र, मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना अखेर माघार घ्यावी लागली. आणि, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
लोकसभेत दारुण पराभव झालेल्या भाजपाला विधानसभेत लॉटरी लागली. तब्बल 132 अधिक अपक्ष आमदार असे सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या भाजपा मुख्यमंत्रीपदाची संधी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नव्हती. आरएसएस, भाजपा आमदार आणि कार्यकर्त्यांच्या जबरदस्त दबावापुढे दिल्हीतील भाजपा हायकमांडलाही झुकावे लागले. याची घोषणा उद्या भाजपाकडून अधिकृतपणे करण्यात येईल. त्यामुळे वानखेडे किंवा शिवाजी पार्क मैदानात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्राने दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला नाराजीचे हत्यार वापरुन बघितले. तसेच शिंदे यांचे नेते बिहारच्या नितीश कुमार यांचे दाखले देत होते. मात्र, या दबाव तंत्राचा काहीएक परिणाम भाजपावर झाला नाही. शेवटी स्वतः ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांना खुलासा करावा लागला की, मी नाराज नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. त्यांच्या या खुलाशामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी अगोदरच मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्यामुळेच शिंदे यांची कोंडी झाली होती. त्यामुळे भाजपा जी मंत्रीपदे देतील, ती मान्य करावी लागतील. शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 7 ते 8 मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपा नगरविकास, अर्थ आणि गृहखाते या दोन्ही पक्षांना देणार नाही. मात्र, वाटाघाटीत जर ही महत्त्वाची खाती मिळाली, तर यांची लॉटरी समजावे, अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या कोंडीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरती कोंडी भाजपाने केली आहे. महायुतीमधून बाहेरही पडू शकत नाही. नाहीतर पुन्हा ईडी, इन्कम टॅक्सचे शुक्लकाष्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. विधानसभेत विरोधी पक्षाकडे 29 आमदार नसल्यामुळे विरोधी नेतेपद मिळणार नाही. त्यामुळे धारावीसारखे मोठ्या प्रकल्पाचे प्रस्ताव एकमताने मंजूर होतील, अशी भीती विरोधी पक्ष व्यक्त करीत आहेत.
ईव्हीएमविरुद्ध रस्त्यावरची लढाई
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यामुळे आता ईव्हीएम मशीनविरुद्ध लढाई रस्त्यावर सुरु झाली आहे. यातून जर यश मिळाले, तर पुढच्या निवडणुकीत मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागेल. जनमताचा रेटा कितपत यशस्वी होतो, हे काळच ठरवेल.