| मुंबई | प्रतिनिधी |
आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य आमदारांना सूरतमध्ये नेण्यात आल्यानंतर राज्यात अभूतपूर्व गोंधळ उडाला. विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर डिनरसाठी जायचे सांगून अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला आणि नंतर आसाम येथील गुवाहाटी येथे नेण्यात आले.
या दरम्यान एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असंही ते त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना उद्देशून म्हणत आहेत.
भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असंही ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.