। पनवेल । वार्ताहर ।
खारघर येथील एका नामवंत शैक्षणिक संस्थेतील 80 वर्षीय निवृत्त डायरेक्टरला अटक करण्याची भीती दाखवत तब्बल 4 कोटी 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे निवृत्त संचालक खारघर सेक्टर-12 मध्ये वास्तव्यास असून ते राजस्थान, जयपूर येथील एका नामांकित इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले आहेत.
18 नोव्हेंबर 2025 रोजी ‘सायबर डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया’मधील अधिकारी असल्याचे सांगत एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तसेच त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून बनावट सिमकार्ड घेतले असून, त्यावरून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे व त्याबाबत त्यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्यांना घाबरवले. यानंतर स्वतः नाशिक पोलीस, क्राइम ब्रँच, एनआयए अधिकारी असल्याचे भासवत वेगवेगळ्या गुन्हेगारांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अटकेची भीती घातली. त्यानंतर पी. आय. संदीप राव, प्रदीप जैस्वाल आणि थेट आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे या डायरेक्टला संपर्क साधत त्यांची केस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्याचे व त्यांच्या नावावर वॉरंट निघाला आहे. अशा प्रकारच्या विविध भीती दाखवून त्यांना घाबरवले. तसेच याबाबत कुणाशी चर्चा करू नये, अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी आरबीआयने उघडलेल्या विशेष खात्यात सर्व पैसे जमा करण्यास सांगितले. त्यावर निवृत्त डायरेक्टरने नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल 4 कोटी 38 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी इतर नागरिकांकडून फसवणूक केलेली 1 कोटी 2 लाख रुपयांची रक्कम 24 व 25 नोव्हेंबर रोजी या वृद्धाच्या खात्यात जमा करून ती इतर खात्यांत ट्रान्सफर करायला लावून त्याचा वापर केला. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी डिसेंबरमध्ये या डायरेक्टरचे बँक खाते फ्रीज केल्याचे त्यांना भासवण्यात आले. त्यानंतर या वृद्धाने नागपूर सायबर पोलिसांशी संपर्क साधला असता हा प्रकार सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर त्यांनी 10 जानेवारी रोजी त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली.






