| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील पाडा भागात असलेल्या राजबाग गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या एका वयोवृद्धाने जीवनाला कंटाळून राजमाता जिजामाता तलावात उडी मारून आत्महत्या केली. नैराश्यातून आपले जीवन संपवत असल्याची चिठ्ठी स्वतःच्या खिशात ठेवून आत्महत्या केली असून, त्या वृद्धाचे वय 75 वर्षे इतके होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडा विभागातील राजबाग गृहनिर्माण सोसायटीत राहणारे जनार्दन नारायण गायकवाड हे येथील 12 नंबर बिल्डिंग मध्ये राहत होते. त्यांनी नेरळ गावातील राजमाता जिजामाता तलाव येथील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दुपारी काही रहिवाशांना पाण्यात वर तरंगलेला मृतदेह आढळून आला. त्यांनतर नेरळ पोलीस यांना कळविण्यात आल्यावर पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह 75 वर्षीय व्यक्तीचा आणि नेरळ गावातील स्थानिक रहिवाशी असल्याचे त्या मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधार कार्ड आणि चिठ्ठीवरून स्पष्ट झाले. सदर वयोवृद्ध व्यक्ती ही नेरळ गावातील पाडा विभागातील राजबाग गृहनिर्माण सोसायटी मध्ये राहणारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी राजबाग सोसायटी गाठली, त्यावेळी येथील बिल्डिंग नंबर 12 मधील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला आणि शव विच्छेदन करून झाल्यावर त्यांची शव नातेवाईक यांच्या ताब्यात दिले. आत्महत्या करणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या खिशामध्ये पोलिसांना आपण आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते आणि त्यांचा मृतदेह सापडल्यावर पत्ता शोधण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी पत्ता देखील लिहून ठेवला होता. या मृतदेहाची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नेरळमधील वयोवृद्धाची आत्महत्या
