। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात रात्री वादळी वारा आणि नंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी विजांचा लखलखाट सुरू असताना नेरळ गावातील राजबाग गृहनिर्माण सोसायटीतील एका झाडावर वीज कोसळली. दरम्यान, त्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाला आग लागली. त्यावेळी पाऊस सुरू असल्याने काही मिनिटांतच ती आग विझल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
कर्जत तालुक्यात रात्री नऊ वाजल्यापासून वादळी वारा सुरू झाला होता. त्या आधी माथेरानमध्ये सायंकाळी सात वाजल्यापासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. यावेळी माथेरान शहरात आलेल्या पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला. तर, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ गावातील पाडा भागात असलेल्या राजबाग गृहनिर्माण सोसायटीतील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर त्या झाडावर आगीचे लोळ पडल्याचे दिसून आले. त्या झाडाच्या बाजूलाच एक रुग्णालय आहे. मात्र, त्यावेळी पाऊस सुरू असल्याने ती आग काही मिनिटांतच विझली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.