| अलिबाग | माधवी सावंत |
रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या रविवारी (दि.5) होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत प्रत्येक मताला अमुल्य महत्व असते. एका मतावर उमेदवाराचे भविष्य ठरते. असे असताना रायगड जिल्ह्यातील अनेक गावच्या मतदार याद्यांमध्ये सावळा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. मयत झालेल्या अनेक मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लोकशाहीत पवित्र मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळाचा ठपका कोणावर ठेवावा? हा प्रश्नच आहे. मतदार मतदान करताना आधारकार्ड सारखी अनेक कागदपत्रे पडताळून बघितली जातात. मगच मतदानाचा अधिकारी दिला जातो. मतदार हयात असतानाही कधी कधी अडथळे येऊन मतदान करता येत नाही.
मयत व्यक्तींची नावे मतदार यादीत राहणे, ही अक्षम्य चूक आहे. यामागची कारणे शोधणे क्रमप्राप्त असून खऱ्या मतदार याद्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणूकांमध्ये मृत व्यक्तींच्या नावे मतदान करण्याचा फंडा वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृत व्यक्तींच्या कुटूंबातील व्यक्तींची भेट घेतली असता त्या कुटूंबियांनी अक्षरशः आश्चर्य व्यक्त केले. व्यक्तीचे निधन झाल्यानंतर रेशनिंग कार्डवरील रेशनिंग देखील तात्काळ बंद करण्यात येते. मग एवढा मोठा सावळा गोंधळ कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मतदारांचे वॉर्ड बदलले
पूर्वी ज्या वॉर्डमध्ये मतदार मतदान करीत होता, त्या वॉर्डमध्ये नाव न येता दुसऱ्याच वॉर्डमध्ये मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बीएलओंचा वेळ वाया
गतवर्षी रायगड जिल्ह्यात बीएलओंमार्फत मतदारांच्या माहितीचे नुतनीकरण करण्यात आले असल्याची माहिती काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. त्यावेळी मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नवमतदारांचे नाव समाविष्ट करण्याचे काम करण्यात आले होते. त्यानूसार मतदारयादीत बदल करणे, ही शासनाची जबाबदारी होती. मात्र तरीही मतदारयाद्यांचे नूतनीकरण का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.