गणेश विसर्जनाला गालबोट

वडघर येथे 11 जणांना विजेचा शॉक

| पनवेल | वार्ताहर |

भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर येथे घडली आहे. विसर्जनादरम्यान शुक्रवारी सायंकाळी आठच्या सुमारास 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले.

वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि विसर्जनासाठी आलेल्या मानस सुनील कुंभार (17) या तरुणाच्या अंगावर पडली. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. यामध्ये सर्वम पनवेलकर (15), तनिष्का प्रसाद पनवेलकर (9 महिने), दिलीप पनवेलकर (65), निहाल चोणकर (5), दीपाली पनवेलकर (24), वेदांत कुंभार (19), दर्शना शिवशिवकर (36), हर्षद पनवेलकर (31), रितेश पनवेलकर (38), रुपाली पनवेलकर (35) यांना शॉक लागून ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने पनवेल परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह पोलीस आणि महापालीकेच्या अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात जेके डेकोरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version