। मुरुड/जंजिरा । वार्ताहर ।
पाऊस पडताच मुरुड शहरातील वीज तासनतास गायब होत असल्याच्या घटना घडत आहे. पाऊस सुरू होताच वीज जात असल्याने त्या मागचे कारणही नागरिकांना सांगण्यात येत नाही. पाब्रे येथून मुरुडला वीज पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून तिथूनही वारंवार वीज खंडीत होत असल्याने प्रति दिवस दोन ते चार तास वीज जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. एकीकडे वाढती उष्णता आणि अपुरा वीजपुरवठा यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. तर, याबाबत जाब विचारण्यासाठी वीज अधिकार्यांना फोन लावल्यानंतर फोन बंद अन्यथा कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याचे संदेश मिळतात. त्यामुळे नागरिक या परिस्थितीला कंटाळले असून हीच परिस्थिती कायम राहिली तर जोराच्या पावसात काय होणार, हा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
अपुर्या वीज पुरवठ्यामुळे मुरूडकरांचे मोठे आर्थिक नुकसान
पहिल्या पावसात वीज गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 4 तास वीज गेल्याने मुरुड तालुक्यातील किमान 150 आईस्क्रीम व दुध विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बँकिंग व्यवहार, ऑनलाईन क्लासेस तसेच संगणकाच्या परीक्षांवरसुद्धा परिणाम झाला आहे. तसेच वीजेअभावी लोकांना वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. मुरुड तालुक्यात 24 ग्रामपंचायती असून पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे विविध दाखले घेण्यासाठी लोक येतात. परंतु वीज नसल्याने त्यांना परत जावे लागते.
लाईट जाण्याची करणे
1) मार्च एप्रिल महिन्यात मेन लाईनवरील झाडे कटाई वेळेवर होत नसल्याने पहिल्या पावसात वीज पुरवठा खंडीत होतो.
2) मे महिन्यातील उकाड्यामुळे वीज वापर वाढतो व ट्रांसफॉर्मवर्सवर अतिभार येऊन ते कमकुवत होतात त्यांची वेळेवर दुरुस्ती होत नाही.
3) दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य पेण-कार्ल्यातून वेळेवर येत नसल्याने कामे उशिरा होतात.
4) ग्राहकांच्या तक्ररी असल्याने त्यांची योग्य पाहणी करून त्याचे तात्काळ निराकरण होत नाही व त्यामुळे मोठे नुकसान होऊन लाईट जाते.
5) मुरुड शहरात समुद्रकिनारी जमिनीखालून मुख्य वाहक तारा टाकण्यात आल्या आहेत. परंतु गेली 3 वर्षे त्या जोडल्या गेल्या नाहीत.