श्रीवर्धनमधील विजेचे खांब गटारात

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून श्रीवर्धन शहरामध्ये सौरदिवे उभे करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने सर्वप्रथम गटाराच्या वरचे कोपिंग तोडून त्यामधून केबल फिरवली आहे. त्यानंतर चांगल्या सुस्थितीत बांधलेली गटारे तोडून त्या ठिकाणी सौरदिवे उभारण्याचा पाया काँक्रीट टाकून बनवण्यात आला आहे. शहराचा विकास होणे हे श्रीवर्धनच्या नागरिकांना अपेक्षितच आहे. परंतु, अशा प्रकारे काम करून जर का विकास केला जात असेल तर, श्रीवर्धनमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याशिवाय राहणार नाही, असे सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे.

सौरदिवे उभे करणाऱ्या ठेकेदाराने वाणी आळी, त्याचप्रमाणे टिळक मार्ग या परिसरामध्ये अनेक ठिकाणी गटारामध्ये खोदकाम करून त्या ठिकाणी स्लॅबचा पाया उभारला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाच्या अभियंत्यांकडून या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारे अशी कामे करताना अडवण्यात आलेले नाही. तसेच, शहरामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे हायमास्ट दिवे देखील बसवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी अनेक चौकांमध्ये हायमास्ट उभारण्यासाठी बांधकाम करण्यात आले आहे. या अगोदर विजेवर चालणारे हायमास्ट सर्वत्र शहरात उपलब्ध होते. परंतु, आता वीजपुरवठा खंडीत झाला तरी सुद्धा सौरदिवेचे हायमास्ट असल्यामुळे शहरात अंधार होणार नाही ही जमेची बाजू आहे. तरी ठेकेदाराला काम करताना अभियंत्यांकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात नसल्यामुळेच ठेकेदार मनमानीपणे काम करत असल्याचे बोलले जात आहे. तरी अशाप्रकारे गटारामध्ये विजेचे खांब उभे करण्यासाठी बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला श्रीवर्धन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विराज लबडे यांच्याकडून कारवाई केली जाईल का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version