पालकमंत्र्यांच्या गावातच विजेची बोंब ; साकडे तरी कोणाला घालावे?

विजेच्या खेळखंडोब्याने रोहेकर त्रस्त
रोहा | प्रतिनिधी |
सातत्याने मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. पालकमंत्री अदिती तटकरे याच रोह्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्याच तालुक्यातच सुरळीत विजेची बोंबाबोब आहे. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी आता कोणाला साकडे घालावे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

कोरोना संकटामुळे दुकाने उघडण्याच्या वेळांवर निर्बंध आले आहेत. काही जणांना वर्क फ्रॉम होम काम करावे लागत असताना, वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नोकरदार वर्गाला त्यांच्या कामात अडचणी येत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने विजेच्या तारांवर फांद्या किंवा झाडे पडणे, यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात येते.

सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात, पाणीपुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत. स्वयंपाकघरात मिक्सर, ओव्हन, ग्राइंडर, इलेक्ट्रीक शेगड्या, घरघंटी, रेफ्रिजरेटर ही साधनेदेखील घरात इन्व्हर्टर असून बंद राहात असल्याने महिलांना ऐनवेळी जेवणाचा मेन्यू बदली करावा लागत असल्याने घरात वादंगाचे प्रसंग होत आहेत. तालुक्याला पालकमंत्रीपदासह एक खासदार, चार आमदार असूनदेखील रोहा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत सुरू राहात नसल्याने आता साकडे तरी कोणाला घालावे, असा प्रश्‍न जनतेमधून विचारला जात आहे.

Exit mobile version