उपसरपंचपदी गीता कुथे बिनविरोध
पाली/बेणसे | वार्ताहर |
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिहूच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या गीता अमृत कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदावरून जनतेचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यावर भर देऊ, लोकाभिमुख कामाबरोबरच ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी अहोरात्र झटणार असल्याचे गीता कुथे यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या पल्लवी भाईर यांनी विक्रमी मताधिक्याने सरपंचपदी निवडून येऊन त्यांच्यासह 13 पैकी 12 सदस्य निवडून आले होते. शेकापचे पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील व जि.प. बांधकाम सभापती अॅड. नीलिमा पाटील यांनी गीता कुथे यांचे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. उपसरपंचांचे चोळे गाव नेहमीच स्वर्गीय भाई मोहनराव पाटील तसेच माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पाठीशी कायम राहिले. शेकापला संघटनात्मकदृष्ट्या बळ देण्याचे काम चोळे गावाने केले. पुन्हा एकदा गीता कुथे यांच्या माध्यमातून जबाबदारीचे पद चोळे गावाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे चोळे विभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.