20 लाख 60 हजार रूपयांची वीज चोरी

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण शहरातील प्रसिद्ध असलेल्या बर्फ फॅक्टरी वाल्यांनी मिटरमध्ये फेरफार करून 20 लाख 60 हजार 220 रूपयांची तब्बल 1 लाख 36 हजार 341 युनिट वीज चोरली असल्याचे उघड झाले आहे. उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गौतम सखाराम तनफरे आणि शेखर म्हात्रे यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार दि 11 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाशी येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. फॅक्टरी चालकाने या फॅक्टरीत असलेल्या मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसविले होते. त्या रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तो मिटर रिडिंगमध्ये फेरफार करत असे. भरारी पथकातील तज्ञानी वीजेचा भार तपासला असता तब्बल 98 टक्के वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. मागील 11 महिन्यात त्यांनी तब्बल 1 लाख 36 हजार 341 युनिटची वीज चोरी केली असून त्याची किंमत 20 लाख 60 हजार 220 रूपयांची असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. सुरूवातीला ही रक्कम भरण्यासाठी या दोघांना सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version