महावितरणने पकडल्या चाळीस लाखांच्या वीजचोर्‍या

| कल्याण | वार्ताहर |
महावितरणच्या कल्याण परिमंडलात उच्चदाब ग्राहकांच्या वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी गेल्या तीन दिवसात टिटवाळा, डोंबिवली आणि विरारमध्ये सुमारे 40 लाख रुपयांच्या चार वीजचोर्‍या पकडल्या आहेत. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून कल्याण परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालय स्तरावर दहा पथके निर्माण करण्यात आली आहेत. या पथकांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली असून गेल्या तीन दिवसात 40 लाखांच्या चार वीजचोर्‍या उघडकीस आणण्यात त्यांना यश आले.

टिटवाळा उपविभागातील गुरवली पाडा येथील जीन्स वाशिंग कंपनीत सर्व्हिस वायरला टॅपिंग करून विकास बबन दळवी या ग्राहकांने तब्बल 25 लाख 85 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे पथकाने उघडकीस आणले आहे. संबंधित ग्राहक व वीज वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती यांना वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे. तर कल्याण पूर्व उपविभाग तीनमधील आरएल झोन येथील पेंढारकर कॉलेजजवळच्या आदर्श स्वीट मार्टमध्ये मीटरमध्ये फेरफार करून सुरू असलेली 7 लाख 58 हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याप्रकरणी ग्राहक गिरीश व अल्पेश चौधरी आणि वीज वापरकर्ता बाबूलाल चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.

डोंबिवलीतील बाजीप्रभू शाखा कार्यालयांतर्गत लेडीज गारमेंट शॉपच्या मीटरमध्ये छेडछाड करून 2 लाख 88 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे पथकाने उघडकीस आणले. याप्रकरणी ग्राहक सुरेश महादू पाटील आणि वीज वापरणार चेतन मोहन गाला यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. तर विरारमधील चंदनसार परिसरात हेअर क्लिप बनवणार्‍या कारखान्याची 3 लाख 37 हजार रुपयांची वीजचोरी पथकाच्या तपासणीत समोर आली. याप्रकरणी कारखानाचालक कृष्णा मधूकर पाटील यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.

Exit mobile version