| मुंबई । प्रतिनिधी ।
कल्याण मंडल कार्यालय एकअंतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीजपुरवठा तपासणीसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने गेल्या दोन महिन्यांत तब्बत एक कोटी 43 लाख रुपयांच्या 38 वीजचोर्या उघडकीस आणल्या आहेत. यातील 29 उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरीच्या देयकांचे एक कोटी 17 लाख रुपये वसूल करण्यात आले असून दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचार्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडल कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर, हाजीमलंग, गौरीपाडा, नेतिवली, खंबालपाडा, सोनारपाडा, सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात वीज वापराच्या माहितीचे विश्लेषण व इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी केली. या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून 38 जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. यातील 29 जणांकडून वीजचोरीच्या देयकाचे एक कोटी 17 लाख रुपये, याशिवाय 12 जणांकडून 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.