जन आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा
| पेण | प्रतिनिधी |
जेएसडब्ल्यू कंपनीच्या विरोधात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. 12 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या गोवा गेटवर जन आंदोलन केले जाणार आहे.शिवसेना नेते विष्णू पाटील,जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी पेण येथे करुन प्रलंबित मागण्यांकडे कंपनीचे लक्ष वेधले आहे. 12 ऑगस्टच्या मोर्चासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने काही प्रमुख मागण्या डोळयासमोर ठेउन जन आंदोलनाचा आराखडा आखला आहे. महत्वाची मागणी म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरभरतीत सामावून घ्या, पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या 45 गावांना शुद्ध पाणीपुरवठा. कंपनीपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यासाठी ठोस उपाययोजना करावी, सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करुनच ते धरमतर खाडीत सोडले जावे, जेणेकरून प्रदूषणामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार नाही, आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे खारबंदिस्ती आणि धरमतर खाडीमधील खोदाई या महत्वाच्या मागण्या शिवसेनेच्यावतीने कंपनीकडे करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनासाठी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, दर्शना जवके,विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व बेरोजगार तरूण सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
अवजड वाहतूक सर्रास
शिवसेनेेने आंदोलनात या मुद्याला हात घालून एक प्रकारे प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि कंपनी प्रशासन यांच्या आपापसातील हितसंबंधानां सुरुंग लावला आहे. आजच्या घडीला 16.4 किमीची खारबंदिस्ती विश्व बॅकेच्या मदतीने पूर्णत्वाला जात आहे. मात्र फक्त आणि फक्त धरमतर खाडीची खोली वाढविल्यामुळे खारबंदिस्ती फुटत आहे. जे.एस.डब्ल्यू कंपनीला आठ हजार टनाच्या वाहतुकीचा परवाना असताना 16 हजार टनापर्यंत वाहतूक करत आहे. या सर्व बाबींचा सर्रास विचार करून 12 ऑगस्टच्या जन आंदोलनाचा घाट शिवसेना उध्दव ठाकरे गटाने घातला आहे.
सरकारच्या धोरणानुसार स्थानिक भूमिपुत्रांची 80 टक्के भरती अनिवार्य आहे. असे असतानाही कंपनी परराज्यातील तरुणांना वेगवेगळया प्लांटमध्ये भरती करत आहे. नंतर कंपनीमध्ये भरती बंद असल्याचा कांगावा करून स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करीत असते. नोकर भरतीसह अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेतर्फे जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे, तरी स्थानिक तरुणांनी आपल्या न्याय हक्कासाठी जन आंदोलनात सामिल व्हावे.
विष्णु पाटील (रायगड जिल्हा संपर्क प्रमुख)