करंजाडेत महावितरणविरोधात एल्गार

वीजसमस्येवर नागरिक आक्रमक; स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

गेल्या सहा वर्षांपासून वारंवार होणारी वीज खंडित आणि भीषण लो-व्होल्टेज समस्येमुळे त्रस्त झालेल्या करंजाडे सेक्टर 5 आणि 5 ए मधील नागरिकांनी आता महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात व्यापक स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांचा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

करंजाडे सेक्टर 5 आणि 5 ए हा वेगाने विकसित होणारा निवासी परिसर असून, येथून महावितरणला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र, या भागातील मुख्य वीजवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून जर्जर अवस्थेत असल्याने दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यातच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रहिवाशांच्या घरातील एसी, फ्रिज, पाण्याचे पंप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

स्थानिकांनी अनेकदा महावितरण कार्यालयाकडे तक्रारी करूनही “निधीअभावी काम रखडले” असे कारण देत प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी संघटित होत स्वाक्षरी मोहिमेद्वारे प्रशासनावर दबाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सेक्टर 5 आणि 5 ए मधील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला असून, अवघ्या दोन दिवसांत हजारो स्वाक्षऱ्या जमा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

नागरिक वेळेवर वीजबिल भरत असताना त्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवी आहे. पुढील 15 दिवसांत मुख्य वाहिनी बदलण्याचे काम सुरू झाले नाही, तर हजारो नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

रामेश्वर आंग्रे,
माजी सरपंच
Exit mobile version