4 जूनपासून उपोषणाचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. (दि.4) जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि.14) छत्रपती संभाजीनगर येथे केली. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्रपणे 10 टक्के आरक्षण दिले असले तरी सगेसोयरे अधिसूचना अद्याप अंतिम झालेली नाही, असेही जरांगेंनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले की, सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचा फायदा मराठ्यांना झाला नाही. समाजातील मुलांचे वाटोळे सुरूच आहे. यामुळे अंतरवाली सराटी येथे (दि.4) जूनपासून उपोषणाला बसणार आहे. जरांगे पुढे म्हणाले, (दि.8) जूनला नारायण गड येथे मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. त्या अनुषंगाने सभास्थळाची पाहणी करायला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात कधी आले नव्हते, मात्र आता ते गोधड्या घेऊन झोपायलाच इथे आहेत. यातूनच मराठा समाजाची ताकद दिसून येते, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींना ही वेळ फक्त त्यांच्या पक्षातील काही नेत्यांमुळे आली आहे, असा टोलाही जरांगे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लगावला.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी करतानाच ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडतील, त्यांच्या सगेसोयर्यांनाही कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. ही मागणी घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर वाशी येथे (दि.26) जानेवारीला या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. राज्य सरकारने जरांगे यांची दुसरी मागणी मान्य करत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याविषयी काढण्यात येणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा सोपविण्यात आला. ही मागणी मान्य झाल्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण संपल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर ही अधिसूचना अंतिम झाली नसल्याने जरांगे यांनी राज्य सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.