हर्षवर्धन सपकाळांचा दिंबांच्या भूमीत एल्गार

महाविकास आघाडीच्या रॅलीला तुफान प्रतिसाद

| उरण-चिरनेर | प्रतिनिधी |

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी (दि.3) लोकनेते दिबांच्या जन्मभूमीत जासईमध्ये आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला.

महाविकास आघाडीचे जासई जिल्हा परिषद मतदार संघात डॉ. मनिष पाटील व चिरनेरमधून ॲड. अविनाश ठाकूर हे उमेदवार उभे आहेत. तर, जासई पंचायत समिती गणात निर्मला घरत, चिर्ले पंचायत समिती गणात प्रियंका मढवी, चिरनेर पंचायत समिती गणात कविता पाटील, व आवरे पंचायत समिती गणात प्रारंभी गावंड हे उमेदवार लढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ दिबांची जन्मभुमी जासई येथे मंगळवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्रून जासई, दिघोडे व कोप्रोली येथील प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, रायगडमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे. केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे; परंतु, दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाखाण्याजोगा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच, महेंद्र घरत यांनी देखील जासईसह उरण तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे, सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, कामगार नेते रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version