ओबीसी सघटनांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

| नागोठणे | वार्ताहर |

रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समितीनेही 18 नोव्हेंबरला अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.

देशात सन 1931 नंतर ओबीसींची जनगणना सरकारने केलेली नाही. त्यामुळेच अठरापगड जातींचा समावेश असूनही ओबीसी समाज शासनाच्या अनेक सोयी-सुविधांपासून आजही वंचित राहिलेला आहे. ओबीसी समाजाची जनगणना होण्यासाठी देशात सर्वत्र लढा उभारण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातही ओबीसी संघटनांच्यावतीने मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

याच मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार नागोठणे विभागातील ओबीसी बांधवांनी केला आहे. याच बैठकीत कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे यांची नागोठणे विभाग ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नागोठणे विभागातील ओबीसी बांधवांची एक बैठक रविवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता येथील नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या कार्यालयात संपन्न झाली. नागोठणे विभागातील गावोगावी जावून ओबीसी समाज बांधवांमध्ये ओबीसींच्या हक्कांविषयी जनजागृती करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार्‍या मोर्चाविषयी माहिती देवून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना मोर्चात सहभागी करून घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

मोर्चाच्या नियोजनाच्या या बैठकीला ओबीसी समाजातील ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, रोहा तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनंत थिटे, दत्ताराम झोलगे, यशवंत हळदे, बाळासाहेब टके, प्रभाकर ठाकूर, राजेंद्र शिंदे, सुनील लाड, एकनाथ ठाकूर, अ‍ॅड. महेश पवार, महेंद्र माने, भारत भोय, चंद्रकांत भोईर, प्रमोद जांबेकर, दिनेश घाग, सुनील नावले, रामू देवरे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच ओबीसी तालुकाध्यक्ष अनंत थिटे यांनी मोर्चाच्या संदर्भात जिल्हा तसेच रोहा तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका, आजी-माजी खासदार, आमदार तसेच ओबीसी समाजातील अनेक मान्यवर व दिग्गजांच्या घेण्यात आलेल्या भेटी-गाठी आणि मोर्चासाठी त्यांनी दिलेले सर्वोतोपरी सहकार्याचे आश्‍वासन याविषयी माहिती दिली. या बैठकीचे आभारप्रदर्शन प्रभाकर ठाकूर यांनी केले.

Exit mobile version